न्यूटनचा गतीचा पहिला नियम | Newtons First Law of Motion in Marathi :-
Must Read (नक्की वाचा) :
न्यूटनचा गतीचा पहिला नियम | Newton’s First Law of Motion in Marathi :- आता आपण न्यूटनचे गतीविषयक नियम काय आहेत ते समजून घेऊ. ब्रिटिश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथ ‘The Principia Mathematica’ मध्ये गतीविषयक तीन नियम मांडले आहेत. हे नियम “न्यूटनचे गतीविषयक नियम” म्हणून ओळखले जातात.
आपण दररोज पाहतो की एखादी वस्तू जर स्थिर असेल, तर ती बल लावल्याशिवाय हलत नाही. उदाहरणार्थ, टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलणे शक्य असते, पण तेच बल वापरून आपण संपूर्ण टेबल उचलू शकत नाही. झाडाची फांदी हलवली की फळे खाली पडतात किंवा विजेवर चालणारा पंखा बंद केल्यावरही काही वेळ फिरत राहतो.
या घटनांवरून आपणास समजते की प्रत्येक वस्तूमध्ये जडत्व हा नैसर्गिक गुणधर्म असतो. वस्तू स्थिर राहते कारण तिच्यात जडत्व असते, आणि गतीमान वस्तू देखील तिच्या गतीतच राहते, जोपर्यंत कोणतेही बाह्य बल कार्य करत नाही. वस्तूचे जडत्व हे तिच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानुसार, “कोणतीही वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहते आणि गतीमान असेल तर ती सरळ रेषेत व समान वेगाने गतीमान राहते, जोपर्यंत तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नाही.”
हा नियम जडत्वाचा नियम (Law of Inertia) म्हणूनही ओळखला जातो.
बल ( Force) :
दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, गाडी चालवणे व वेळप्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे,अशा अनेक क्रिया करतो. त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल (Force) म्हणतात.
बलाचे वर्गीकरण ( Classification Of Force ) :
संतुलित बल (Balanced force) :
- एखादी वस्तू स्थिर असेल तर तिच्यावर संतुलित बल प्रयुक्त असते.
- उदा. एखाद्या टेबलवर वस्तू ठेवली असता ती स्थिर असते कारण तिच्यावर दोन सारखेच पणविरुद्ध दिशेने बल प्रयुक्त असते.
- एक म्हणजे लंबरूप खालच्या दिशेने गुरुत्वबल ( Force of Gravity )
- दुसरे म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाचे विरुद्ध बल ( Normal Reaction )
- म्हणजेच स्थिर वस्तूवर संतुलित बल प्रयुक्त असते.
- रस्सीखेच मध्ये दोन्ही संघाद्वारे लावलेले बल
- जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
- संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.

असंतुलित बल (Unbalanced force) :
- जर एखाद्या वस्तुची जागा बदलायची असेल किंवा ती गतिमान करायची असेल तर त्या वस्तूवर असंतुलित बल लावावे लागते.
- असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
- वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
- उदा. स्थिर वस्तू विस्थापित करणे.

घर्षणबल (Frictional force):
- घर्षणबल (Frictional force) म्हणजे दोन पृष्ठभागावरील विरुद्ध दिशेने, दोन वस्तूच्या घर्षणामुळे तयार होणारे बल होय.
- आपण जमिनीवर चालतो तेव्हा आपला तळपाय आणि जमीन हे एकमेकावर घासले गेल्याने त्यांच्यात थोडा अधिक रोध निर्माण होतो. ह्यालाच आपण घर्षणाचं बल म्हणतो.
- हे बल आपली गती कमी करतं. जमीन खूप खडबडीत असली तर घर्षण जास्त आणि अगदी गुळगुळीत असली तर घर्षण कमी असते.
- घर्षणबलाची दिशा ही वस्तूच्या गतीच्या दिशेच्या विरुध्द असते.
- उदा.: जमिनीवर चालणे, ब्रेक लावताना चाक व रोग यातील घर्षण इत्यादी.

प्रतिक्रिया बल (Reaction Force) :
- प्रतिक्रिया बल (Reaction Force) म्हणजे एखादी वस्तू गतिमान असताना तिला दुसऱ्या पृष्ठभागाने प्रयुक्त केलेले बल होय.
- उदा.: चेंडू जमिनीवर आदळला असता उंच उसळतो.
जडत्व (Inertia) :
- वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व (Inertia) असे म्हणतात.
- म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तूस्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते.
- वस्तू स्थिर असेल तर गतिमानतेला विरोध करते. गतिमान असेल तर स्थिर होण्यास विरोध करते.
- जडत्व हे वस्तुमानावर अवलंबून असते. समजा एखादा मोठा धोंडा आहे. त्याला हलवण्यासाठी आपण बल लावूनही तो जागचा हालत नाही, ह्याचं कारण काय? तर त्याच्या वस्तुमानामुळे त्याला जडपणा म्हणजे जडत्व असते. त्या धोंडयाला आपण त्याच्या घर्षणाच्या बलापेक्षा जास्त बल लावून ढकललं तर त्याला गती प्राप्त होते. ही गती त्याला बाह्य बलामुळे मिळालेली असते.
- टिचकीमुळे पुठ्ठा दूर गेला आणि जडत्वामुळे नाणे ग्लासात पडले.
जडत्वाचे प्रकार (Types of Inertia) :
विराम अवस्थेचे जडत्व (Inertia at Rest) :
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेचे जडत्व (Inertia at Rest) म्हणतात.
- उदा :-
- बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात.
- फांदी हलवल्यावर झाडावरुन फळ खाली पडते.
- सतरंजी झटकल्यावर, धुळीचे कण विराम अवस्थेत राहतात.
गतीचे जडत्व (Inertia due to motion) :
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, त्यास गतीचे जडत्व (Inertia due to motion) म्हणतात.
- उदा :
- विजेच्या पंख्याचे बटण बंद केले तरी काही काळ फिरत राहतो.
- चालत्या बसमधून उतरणारा प्रवाशी पुढच्या दिशेने ढकलला जातो.
- बस अचानक थांबल्यावर प्रवाशांना पुढच्या दिशेने धक्का बसतो.
दिशेचे जडत्व (Inertia due to Direction):
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही, यास दिशेचे जडत्व (Inertia due to Direction) म्हणतात.
- उदा :
- चाकूला धार करताना धार लावणार्या चाकाच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.
- वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात.
न्यूटनचा गतीचा पहिला नियम काय आहे?
विकिपीडिया नुसार :- न्यूटनचा पहिला नियम
” प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते. “
- एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही.
- अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही.(a=0)
- वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर बल (F=0) लावले नसताना वस्तू जर स्थिर (v=0) असेल तर ती स्थिर राहील. तिला गती (v≠0) असेल, तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील.
- थोडक्यात गतीचा पहिला नियम हा जडत्वाची व्याख्या सांगतो. जडत्वाचे सर्व उदाहरणे ही गतीच्या पहिल्या नियमात मोडतात.
न्यूटनचा गतीचा पहिला नियम | Newtons First Law of Motion in Marathi :
“जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. यालाच ‘जडत्वाचा नियम (Law of Inertia) ‘ असे म्हणतात. “
Frequently Asked Questions in Newtons First Law of Motion in Marathi :-
प्रश्न . न्यूटनचा पहिला नियम कोणता?
उत्तर :- न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.
प्रश्न . न्यूटनच्या पहिल्या नियमाचे सूत्र काय आहे?
उत्तर :- न्यूटनच्या पहिल्या नियमाचे सूत्र :- p = mv (वेग = वस्तुमान × वेग) F = ma (बल = वस्तुमान × प्रवेग) तर, थोडक्यात : अशा प्रकारे, न्यूटनचा पहिला नियम संवेगाच्या संरक्षणाचे वर्णन करतो. जर F = 0, तर p = mv स्थिर आहे.
निष्कर्ष :
न्यूटनचा गतीचा पहिला नियम आपल्याला हे शिकवतो की कोणतीही वस्तू स्वतःहून तिच्या स्थितीत बदल करत नाही. म्हणजेच, जर ती स्थिर असेल तर स्थिरच राहते आणि जर ती गतीमान असेल तर ती सरळ रेषेत व समान वेगाने चालत राहते, जोपर्यंत कोणतेही बाह्य बल तिच्यावर कार्य करत नाही. हा नियम जडत्व या नैसर्गिक गुणधर्मावर आधारित आहे. वस्तूंचे जडत्व हे त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असते. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक उदाहरणांद्वारे आपण हा नियम अनुभवू शकतो. त्यामुळे न्यूटनचा पहिला नियम गतीचे मूलभूत तत्व स्पष्ट करतो आणि भौतिकशास्त्रातील महत्वाचा पाया म्हणून ओळखला जातो.
अशाच रंजक आणि सोप्या विज्ञानविषयक माहिती, प्रयोग, आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी GanitiGuru ला फॉलो करा!
गणितासोबतच विज्ञानही आता सोपं आणि मजेदार!
गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

Pingback: न्यूटनचा गतीचा दुसरा नियम | Newtons Second Law of Motion in Marathi |
Pingback: न्यूटनचा गतीचा तिसरा नियम | Newtons Third Law Of Motion In Marathi |